नगर -शहरासह जिल्ह्यात काही भागांत पावसाने आज जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे कोसळली. गेल्या चार दिवसांपासून शहरात तापमानात वाढ झाली होती. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह हवेत उष्माही होता. रविवार मध्यरात्री, तर सोमवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली.
शहरात सखल भागात पाणी साचले होते. तर काही ठिकाणी धुवॉंधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तसेच शहरातील पाईपलाईन, एकवीरा चौक, प्रोफेसर चौक, गुलमोहर रस्ता परिसरात भाजीविक्रेत्यांची तारांबळ उडाली. वादळी वारा आणि झाडांच्या फांद्या पडल्याने शहरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. जिल्ह्यातही अनेक भागास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. मात्र, खरिपाच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.