पुणे – गेली दोन दशके भाजपचा कसबा विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला अजिंक़्य ठेवणाऱ्या खासदार गिरिश बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या जाहीर प्रचारातून माघार घेतली आहे. “प्रकृती अस्वस्थामुळे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारातून माघात घेत आहोत’ असे बापट यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे, कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असून बापट यांच्या माघारीने उलट सुलट चर्चाना सुरूवात झाली आहे.
त्यामुळे, बापट यांच्या प्रकृतीचे कारण देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंग़ळवारी सायंकाळी खासदार गिरिश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच प्रकृतीमुळे ते निवडणुकीचा प्रचारात उतरू शकत नसले तरी, निवडणुकीकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे कसबा असो किंवा चिंचवड भाजप दोन्ही ठिकाणी निवडून येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
खासदार गिरिश बापट गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. त्यातच, हा मतदारसंघ बांधण्यात त्याचा मोठा वाटा असल्याने भाजपला या निवडणूकीत बापट यांची जनसंपर्क, कार्यकर्त्यांची फळी, निवडणूकीची गणिते जुळविण्यासाठी गरज होती. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बापट यांची भेट घेतली होती. त्यावेळी, कसब्याची काळजी करू नका असे आश्वासन बापट यांनी दिले होते.
मात्र, अचानक बापट यांनी कसबा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी आणि महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असतानाच बापट यांचे प्रचारात नसणे भाजपची अडचण वाढविणारी असल्याचे बोलले जात आहे.
मनसे आता हिंदूत्वाच्या ब्रॅकेट मध्ये…
उमेदवार नसलेला पक्ष, कार्यकर्ता नसलेला पक्ष अशी टिका फडणवीस यांनी अनेकदा मनसेवर केली आहे. त्यामुळे, कसबा विधानसभा निवडणूकीसाठी भाजपला मनसेची गरज का भासली याबाबत फडणवीस यांना विचारले असता; ” मनसे आता हिंदूत्ववादी झाले आहे आणि हिदूंत्ववादीच्या ब्रॅकेट मध्ये बसलेले सर्वच आमचे जवळचे आहेत’ असे सांगत मनसेच्या युतीबाबत फडणवीसांनी समर्थन केले. तसेच निवडणूकीत मदत घ्यावीच लागते असेही ते म्हणाले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवडणुकीसाठी येत नसून, शिवसृष्टीच्या उद्घाटन आणि मोदी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी येत आहेत. त्यामुळे कसबा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात ते असणार नाहीत असा खुलासाही त्यांनी केला आहे.