वरवंड – दौंड तालुक्यातील पाटस येथील पती -पत्नी डॉक्टरांचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . यामुळे पाटस गावात करोनाचा शिरकाव झाला आहे. पाटस परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटस मधील दोन डॉक्टर करोना पॉझिटीव्ह असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने आणि पाटस ग्रामपंचायतीच्या वतीने सदर डॉक्टरांच्या हॉस्पिटल चा परीसर बाबू लावून सील करण्यात आला आहे . तसेच पाटस ग्रामपंचायतीच्या वतीने सोडियम हायपोक्लोराईड चा जंतू नाशक औषधाची फवारणी करण्यात येत आहे.
करोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागातील डॉक्टर देखील चांगल्या प्रकारची सेवा देण्याचे कार्य करत आहेत. मात्र च्या डॉक्टरांना आता कोरोनाने ग्रासले असल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णांची धाकधूक वाढली आहे. पाटस परिसरातील डॉक्टर करोना बाधित आढळून आले असले तरी परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. संबंधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे तपासणीसाठी नमुने घेण्याचे काम सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना काही त्रास होत असेल त्यांनी शासकीय रुग्णालयात याची कल्पना द्यावी असे आव्हान डॉ.अशोक रासगे यांनी केले आहे.