जम्मूतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बार्शीतील जवान शहीद

पुलवामा: भारताच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांनी जोर धरला आहे. त्यातच आज पहाटे जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान, या झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील एक जवान शहीद झाला आहे. तर या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे.

या दहशतवादी हल्ल्यात बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सुनील दत्तात्रय काळे (41) हे शहीद झाले आहेत. काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. तसेच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. मात्र ते लॉकडाऊनमुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत.

आज पहाटे दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. सुनील काळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांना शेतीची आवड होती. परिवाराची तसेच आपल्या मित्रांची काळजी घेणारे अशी त्यांची ओळख. त्यांची सुट्टी मंजूर होती, पण ते लॉकडाऊनमुळं येऊ शकले नाहीत, त्यांनी नवीन घर बाधलं, ते अद्याप तिथं राहायलाही गेले नाहीत, त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त कळताच पूर्ण पानगाव बंद करण्यात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्य थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. श्रीनगरमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, शहरातील जूनिमार परिसरात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षाबलाने या परिसराला घेरले आहे आणि सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.