मांडवगण फराटा, दि. 8 (वार्ताहर) -येथील 28 वर्षीय तरुण व सादलगाव येथील एका 65 वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मंजूषा सातपुते -इसवे यांनी दिली. मांडवगण फराटा येथील एका तरुणाने वाघोली येथे स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. यात त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या 16 जणांना क्वारटांइन करण्यात येणार आहे.
सादलगाव येथील एका 65 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या महिलेच्या संपर्कात 7 जण आले आहेत. शिरूरच्या पूर्व भागात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक अजूनही करोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक मास्क न घालता खुलेआम फिरताना दिसत आहेत.
आजपर्यंत शिरूरच्या पूर्व भागातील शिरसगाव काटा, आंधळगाव, वडगाव रासाई, तांदळी, इनामगाव या 5 गावात करोनाचा प्रवेश झालेला नाही. शिरूरच्या पूर्व भागातील अनेक गावात नागरिक सोशल डिस्टंन्सिगचे नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत.