करोना ‘काळ’वर्ष’: ऑनलाइन शिक्षणाचा नवा “धडा’…

पुणे – करोनामुळे टाळेबंदी लागू, शाळा-महाविद्यालये बंद, पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाचीच फक्‍त परीक्षा अन्‌ तीदेखील ऑनलाइन, पहिल्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणींचा पाढा, प्रवेशप्रक्रियाही ऑनलाइन, शिक्षणही ऑनलाइन आणि यापुढच्या परीक्षाही ऑनलाइनद्वारे होणार….या वर्षभरातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक घडामोडी करोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत घडल्या. करोनाच्या संकटात ऑनलाइन शिक्षण हा उच्च शिक्षणात महत्त्वपूर्ण ठरू शकतो, हा धडा मात्र सर्वांनीच अनुभवला.

दहावी-बारावीच्या एक-दोन विषयांच्या परीक्षा राहिल्या होत्या. विद्यापीठाच्या परीक्षा काही महिन्यांत होणार होत्या. ऐन परीक्षांच्या काळात करोनाचे महासंकट सर्वापुढे उभे राहिले. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आली. त्यामुळे परीक्षा कशा घ्यायची, याची सत्त्वपरीक्षा विद्यापीठांवर येऊन ठेपली. दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तर विद्यापीठाची परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्याचा निर्णय झाला. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, ही भूमिका घेत केवळ अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा टप्पा राज्य शासन व विद्यापीठांना पूर्ण करावयाचा होता. त्यामुळे पहिल्याच ऑनलाइन परीक्षेत राज्यभरातील सर्वच विद्यापीठांना मोठी कसरत करावी लागली.

करोना आणि लॉकडाऊनमुळे शैक्षणिक संस्थांची आर्थिक घडी विस्कटली. काही जणांची नोकरी गेल्याने पालकांनाही शुल्क भरणे अशक्‍य होऊन बसले. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन कपातीला सामोरे जावे लागले. अजूनही काही पालक शुल्क भरण्याच्या मनस्थितीत नाहीत. शालेय शिक्षण विभागाने पालकांकडे शुल्काचा तगादा लावू नका, असे स्पष्ट सांगितले. मात्र, शिक्षणसंस्थांकडून शुल्काची वसुलीसाठी सर्व तऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत. ही बाब आता न्यायप्रविष्ट बनली आहे.

शिक्षणाचे नवे अंग
वर्षभरात विद्यार्थी घरी बसून आहेत. मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण सुरू झाली. सुरुवातीला वाटणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाला नंतर मात्र विद्यार्थीही कंटाळले. विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करणे, शैक्षणिक वर्ष सुरू ठेवणे शिक्षणसंस्थांना आवश्‍यक बनले. मात्र, ऑनलाइन शिक्षण हा आता नित्याचा भाग बनला आणि भविष्यात ऑनलाइन शिक्षण हा शिक्षणाचे अंग बनणार हे मात्र करोना काळात सिद्ध झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.