करोना काळ’वर्ष’ : अन्‌…आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली

महाराष्ट्रातील पहिला करोना बाधित पुण्यात सापडला. धायरीतील दाम्पत्य दुबईहून आल्यावर त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि प्रशासन खडाडून जागे झाले. मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन झाले. एप्रिल अखेरपर्यंत पुण्यात बाधित संख्या 1,518 वर पोहचली. तर, 85 जणांचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर बाधितांची संख्या दुपटीने वाढू लागली आणि संपूर्ण राज्याला संसर्गाने वेढून घेतले. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 48 हजार 223 बाधित सापडले, तर 1 हजार 154 जणांचा मृत्यूची नोंद झाली.

सप्टेंबरमध्ये उद्रेक…
मागील वर्षभरापासून नागरिक करोनाच्या दहशतीखाली आहेत. सहा महिन्यांच्या उद्रेकानंतर बाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, फेब्रुवारी-2021 मध्ये करोनाने पुन्हा डोके वर काढले. त्यानंतर बाधितांचा आकडा पुन्हा वाढत आहेत. मागील वर्षभरात महिन्यानुसार करोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीवर लक्ष दिले, तर सप्टेंबरमध्ये करोनाचा उद्रेक झाला. 1 लाख 69 हजार 548 नमुने तपासणीमध्ये तब्बल 48 हजार 223 व्यक्तींना करोनाची लागण झाली. बाधित सापडण्याचे प्रमाण जवळपास 29 टक्के होते. मे आणि जूनममध्ये हे प्रमाण 11 ते 18 टक्के तर जुलै आणि ऑगस्टमध्ये 20 ते 24 टक्के इतके होते.

ऑक्‍टोबरनंतर दिलासा…
ऑक्‍टोबरपासून बाधित सापडण्याचा आलेख खाली येऊ लागला. ऑक्‍टोबरमध्ये 15 हजार 7, तर नोव्हेंबरमध्ये 8 हजार 286 बाधित सापडले. 50 हजारांवर पोहचलेली सरासरी बाधित संख्या तब्बल 7 हजारापर्यंत खाली होती. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत मिळून 15 हजार 152 म्हणजेच महिन्याला सात हजारांच्या आसपास बाधित सापडले.
मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले आणि केवळ 28 दिवसात बाधित संख्या 16 हजार 678 ने वाढली.

एकूण मृत्यूच्या 73% मृत्यू 5 महिन्यांत
मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत शहरात 85 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत (8 मार्च) शहरात 4 हजार 890 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू सप्टेंबरमध्ये 1 हजार 154 जणांचा झाला. ऑगस्टमध्ये 969 तर जुलैला 650 आणि ऑक्‍टोबरमध्ये 699 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जूनमध्ये 323 तर मे महिन्यात 222 जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे जून ते ऑक्‍टोबर या पाच महिन्यांत तब्बल 3 हजार 578 जणांचा म्हणजेच एकूण मृत्यूच्या संख्येत 73 टक्के मृत्यू झाले आहेत.

बाधितांपेक्षा करोनामुक्‍त वाढले
शहरात आतापर्यंत 2 लाख 8 हजार 330 करोना बाधित सापडले आहेत. त्यातील 1 लाख 96 हजार 751 बाधित सुखरूप बरे होऊन घरी गेले आहेत. बाधित बरे होण्याचे प्रमाण जवळपास 95 टक्के इतके आहे. वर्षभरातील करोनामुक्तीच्या संख्येवर लक्ष दिले, तर ऑगस्टमध्ये बाधित संख्या 36 हजार 150 असले तरी करोनामुक्त संख्या 41 हजार 156 इतकी होती. ऑक्‍टोबरमध्ये 15 हजार बाधित असताना 25 हजार 65 बाधित करोनामुक्त झाले. डिसेंबर आणि जनेवरीमध्येही बाधितांपेक्षा करोनामुक्त संख्या अधिक होती. तर अन्य महिन्यांत करोनामुक्तपेक्षा बाधित संख्या अधिक होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.