पद्मावतला करणी सेनेने केलेला विरोध प्रेक्षक अद्याप विसरलेले नसतील. अनेक महिने आंदोलन, निदर्शने, कोर्ट कचेऱ्या झाल्यानंतर नाव “पद्मावती’चे “पद्मावत’ असे बदलून तो सिनेमा रिलीज् झाला होता. आता अक्षय कुमार अणि मानुषी छिल्लरच्या “पृथ्वीराज’लाही करणी सेनेने विरोध करायला सुरुवात केली आहे.
“पृथ्वीराज’ची संपूर्ण स्क्रीप्ट करणी सेनेने वाचायला मागितली आहे.
तसेच कोणत्याही तथ्याशी छेडाछेडी केली जायला नको, असेही या संघटनेने म्हटले आहे. सध्या “पृथ्वीराज’चे शूटिंग जयपूरमध्ये सुरू आहे. तेथे जाऊन शूटिंगमध्येही या संघटनेने अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी अक्षय कुमार उपस्थित नव्हता.
पृथ्वीराज चौहान यांच्याशी संबंधित या सिनेमाच्या कथानकाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे डायरेक्टर डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी करणी सेनेला सांगितले आहे.
या सिनेमातून 2017 ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलीवूड्मध्ये पदार्पण करते आहे. तिच्या पदार्पणाच्या सिनेमाला या विरोधामुळे व्यत्ययाला सामोरे जावे लागते आहे. अद्याप या संदर्भात करणी सेनेने कोणतेही मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिलेला नाही. मात्र तो धोका कायम आहे.