साडेचार कोटी रुपयांचे व्यायाम साहित्य खरेदीचा प्रस्ताव चर्चेशिवाय मंजूर
पुणे – ड्रेनेज आणि नाले सफाईच्या कामांमध्ये होणारी उधळपट्टी रोखून महापालिकेचे उत्पन्न 7 हजार 390 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेले कडक आश्वासन अवघ्या दोन आठवड्यातच हवेत विरून गेले आहे. सलग दोन वर्षी खरेदी केलेल्या सुमारे 10 कोटी रुपयांचे व्यायाम साहित्य कोठे बसवले याचा लेखाजोखा अद्याप नसताना पुन्हा एकदा तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या व्यायाम साहित्याच्या खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
महापालिकेच्या कार्यकक्षेतील व्यायामशाळांना व्यायामाचे साहित्य पुरवणे यासाठी भांडार विभागाने निविदा काढली होती. सुमारे 4 कोटी 55 लाख रुपये किंमतीची ही निविदा तसेच ओपन जीमसाठी साहित्य पुरवण्याची 80 लाख रुपयांची स्वतंत्र निविदा “मे. त्रिमूर्ती इंजिनिअरींग’ या ठेकेदार कंपनीने 4 टक्के कमी दराने भरली. मागील दोन्ही आर्थिक वर्षातही अगदी मार्च महिला संपतानाच व्यायामाचे साहित्य खरेदीच्या निविदा मंजुरीसाठी आल्या होत्या. त्यादेखील याच ठेकेदार कंपनीला मिळाल्या होत्या, हा “निव्वळ’ योगायोग आहे का, याविषयी पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.
राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या जेईएम पोर्टलवरून हे साहित्य घेण्यापेक्षा महापालिकेने सलग दोन वर्षे एबीसी प्रॉक्युअर आणि यंदा महाटेंडरवरच निविदा काढली. त्यातून भांडार विभागाकडून हा प्रस्ताव तपासणीसाठी दक्षता विभागाकडे गेला. त्यामध्ये “मे.त्रिमूर्ती इंजिनिअरींग’ची निविदा ही केवळ पॉईंट 09 कमी दराने असून, त्यावर अभिप्राय मागवण्यात आला.
पूर्वी मोठ्या प्रमाणावर व्यायाम साहित्य खरेदी केले आहे. ते वापरात आहे किंवा नाही याची खातरजमा होणे अपेक्षित असल्याचेही भांडार विभागाने चार मार्चला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. यानंतरही दक्षता विभागाने केवळ एस्टीमेट कमिटीच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेल्या नॉन डीएसआर रेटनुसार दक्षता विभागाने मंगळवारी सकाळी प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्याकडे पाठवला. व्यायामाचे साहित्य कोठे बसवले याचे जिओ टॅगिंग फोटोसह सादर करावे, असा शेरा गोयल यांनी त्यावर मारून 11 वाजता होणाऱ्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला आणि तो सेकंदात मंजूरही झाला.
10 कोटींचे साहित्य बसविल्याची माहिती नाही…
पूर्वी खरेदी केलेले 10 कोटी रूपयांचे व्यायाम साहित्य कोठे बसवण्यात आले आहे, याची महापालिकेच्या भांडार अथवा अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात माहितीच उपलब्ध नाही. भांडार विभागार्मात हे साहित्य क्षेत्रीय कार्यालयांच्या स्वाधीन केले जाते. केवळ साहित्य दिल्याच्या पोहोच पावतीवर स्वाक्षरी घेतली जाते. प्रत्यक्षात हे साहित्य बसवण्याची आणि ते बसवल्याचे छायाचित्र बिलासोबत जोडणे ही जबाबदारी ठेकेदाराकडे असते. मात्र, मागील दोन्ही वर्षातील व्यायाम शाळा साहित्य खरेदीच्या फाईलला एकाही ठिकाणचा फोटो नाही, ही वस्तुस्थिती या फाईल तपासल्यानंतर समोर येत आहे.
यापूर्वी बसवण्यात आलेल्या व्यायाम साहित्याचे ऑडीट तसेच यावर्षीचे साहित्य कोठे बसवण्यात आले आहे, याला जिओ टॅगिंग करावे. तसेच, ठिकाणांची छायाचित्र माझ्या कार्यालयात जमा करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.
– शांतनू गोयल, अतिरिक्त महापालिका आयुक्त
व्यायाम साहित्य खरेदीबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला होता. प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती