कपूर खानदानाची आणखी एक पिढी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तयार झाली आहे. करिष्मा कपूरची मुलगी समायरा कपूर एका शॉर्ट फिल्ममधून ऍक्टिंग वर्ल्डमध्ये पदार्पण करते आहे. या शॉर्ट फिल्मचे नाव “दौड’ असे आहे. चंकी पांडेची धाकटी मुलगी आणि अनन्याची बहीण रिसा पांडेने या शॉर्ट फिल्मचे डायरेक्शन केले आहे. या शॉर्ट फिल्मची कथा देखील रिसा पांडेनेच लिहीली आहे.
फक्त साडेसात मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममध्ये अनिल आणि बोनी कपूर यांचा धाकटा भाऊ संजय कपूरचा मुलगा जहान कपूरनेही ऍक्टिंग केली आहे. “दौड’ ही मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका मुलीची कथा आहे. ही मुलगी पेन्सिल विकून उदरनिर्वाह करत असते. पण तिला प्रोफेशनल ऍथलीट बनण्याची महत्त्वाकांक्षा असते. तीन युवक त्या मुलीला मदत करतात.
हे तिघेही मिळून या मुलीला विजय मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. रिसाच्या पदार्पणासाठी चंकी पांडेने या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. “दौड’चे बहुतांश शुटिंग मुंबईतील सेंट ऍन्ड्रू टर्फ ग्राऊंडवर झाले आहे. समायराने यापूर्वी 8 वर्षे वय असताना “बी हॅपी’ नावाच्या अशाच आणखी एका शॉर्टफिल्ममध्ये काम केले होते.