कराड – उन्हाळ्यात सर्रासपणे आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. यंदा मात्र हे फळ हिवाळ्यातच दाखल झाले आहे. येथील दत्त चौक परिसरात या कलिंगडाचे मोठे ढीग बाजारात विक्रीसाठी ठेवले आहेत. सिझन सुरू होण्या आधीच कलिंगड बाजारात आल्याने नागरिकात काही प्रमाणात कुतूहल निर्माण झाले आहे.
असह्य उन्हाळा काही प्रमाणात सुसह्य करण्यासाठी कोल्ड्रिंक्स सह वेगवेगळ्या उन्हाळी फळांचा नागरिकांकडून उपभोग घेतला जातो. यात प्रामुख्याने कलिंगडाला मोठी मागणी असते. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटालाच आटपाडी जि. सांगली भागातील शुगर किंग जातीची कलिंगडे करडातील बाजारात दाखल झाले आहेत. फळविक्रेते रामभाऊ होगडे यांच्याकडे मंगळवारी रात्री कलिंगडाचा ट्रक दाखल झाला आहे. साधारणतः 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत या कलिंगडाच्या खरेदीचा भाव आहे. त्यामुळे थंडीतही या कलिंगडाची विक्री हळूहळू सुरु झाली आहे.
कराडमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच येथील दत्त चौक, बस स्थानक परिसर, स्टेशन रोड, कोल्हापूर नाका यासह जिथे वर्दळीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कलिंगडे दाखल होतात. यासाठी रस्त्याकडेला विक्रेते या कलिंगडाचे मोठंमोठे ढीग लावून ग्राहकांना आकर्षित करत असतात.
मात्र गेल्या काही वर्षापासून शुगर किंग जातीची कलिंगडाची लागवड बारा महिने केली जात आहे. त्यामुळे हिवाळ्यातच या कलिंगडाला मार्केट मिळू लागले असल्याचे विक्रेते होगडे यांनी सांगितले.
आधी उन्हाळ्यात येणाऱ्या कलिंगडाचे उत्पादन बारमाही सुरू झाले आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री आटपाडी भागातील या शुगर किंग जातीच्या कलिंगड शहरात विक्रीसाठी आल्याने त्याच्या खरेदीसाठी शहरातील नागरिक हळूहळू गर्दी करत असल्याचे दिसत आहे.