मनोहर शिंदे यांची माहिती; नागपूर येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
कराड – मलकापूर नगरपरिषदेने राज्यामध्ये विविध नावीण्यपूर्ण योजना राबवून इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर एक आदर्श नगरपरिषद म्हणून नावलौकिक मिळविला आहे. पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामाचे अंदाजपत्रक विचारात घेता आवश्यक असणाऱ्या 5 कोटी रूपयांच्या निधीची मागणी नागपूर येथे समक्ष भेटून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यावेळी यांनी त्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
नागपूर येथील भेटीप्रसंगी आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे उपस्थित होते.
सध्या मलकापूर नगरपरिषदेचे प्रशासकीय कामकाज यशवंत हौसिंग सोसायटी येथील मुख्य कार्यालयामध्ये प्रशासन, कर, जन्ममृत्यू विभाग व लक्ष्मीनगर येथील बहुउद्देशीय इमारतीमध्ये लेखाविभाग, आरोग्य, बांधकाम, नगररचना, आस्थापना, विद्युत विभाग तर आगाशिवनगर येथे पाणीपुरवठा विभाग, विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी येथे वाचनालय व महिला बालकल्याण विभाग सुरु आहे.
सदरचे प्रशासकीय कामकाज एकाच इमारतीमध्ये व्हावे व नागरिकांना एकत्रितरित्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता नगरपरिषदेने नवीन प्रशासकीय इमारतीचे काम हाती घेतले आहे. सदर प्रशासकीय इमारत ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची प्रतिकृती असल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही इमारत शोभनीय असणार आहे.
या इमारतीकरीता तत्कालीन मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी 7 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना इमारतीमधील बैठक व्यवस्था, विद्युतव्यवस्था व सुशोभिकरण याकरीता आणखी निधीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर त्यांनी निधी उपलब्ध करुन देण्यास सहमती दर्शविली.
मलकापूर शहर तीन विभागामध्ये वसले असून प्रामुख्याने लक्ष्मीनगर, आगाशिवनगर व शास्त्रीनगर यांचा समावेश आहे. शहरामधून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 गेला असल्यामुळे वाहतुकीच्यादृष्टीने महामार्ग ओलांडणे अडचणीचे ठरत आहे. सध्या मलकापुरात लक्ष्मीनगर येथे स्मशानभूमी/ दफनभूमी असून हे ठिकाण शहराचे पूर्व भागामध्ये असल्याने आगाशिवनगर भागातील नागरिकांना अत्यंविधीसाठी कराड येथे जावे लागते.
नागरिकांच्या मागणीनुसार आगाशिवनगर भागात मलकापूर शहर विकास आराखड्यामध्ये स्मशानभूमी/ दफन भूमीसाठी जागा आरक्षित करुन ती भूसंपादन करुन नगरपरिषदेचे ताब्यात घेण्यात आली आहे. सदर जागेस संरक्षक कंपाऊंड करण्याकरीता आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी 30 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
उर्वरित कामासाठी 2.50 कोटीची आवश्यकता आहे. याबरोबरच सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या कामामुळे खराब झालेले रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्यासाठी विशेष रस्ते निधीतून 4.50 कोटी रूपयांच्या निधीची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असून सदरचा निधी मंजूर करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.