कराड – स्कॉर्पियन गटातील “आयएनएस वागशीर’ ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. केंद्र सरकारने “मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत या पाणबुडीची संपूर्ण वातानुकूलन यंत्रणा कराडमधील “श्री रेफ्रिजरेशन’कडून घेतली आहे. नौदलाचे कडक नियम आणि दर्जा कराडच्या कंपनीने राखला आहे. कराडमध्ये तयार झालेली ही यंत्रणा देशाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी वापरली जात असल्याची बाब कराडकरांसाठी अभिमानाची आहे. यामुळे कराडच्या औद्योगिक क्षेत्राचे योगदान देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर बऱ्याच काळानंतर पुढे आले आहे.
“आयएनएस वागशीर’ ही पाणबुडी मुंबईत देशाचे संरक्षण सचिव अजयकुमार यांच्या हस्ते भारतीय नौदलात बुधवारी दाखल झाली. या पाणबुडीमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. या पाणबुडीत वापरण्यात आलेली वातानुकूलन यंत्रणा कराडच्या श्री रेफ्रीजरेशनच्या आर. जी. शेंडे यांनी तयार केली आहे. शेंडे यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
फ्रेंच कंपनीऐवजी कराडमध्ये तयार झालेली ही यंत्रणा देशाची संरक्षण यंत्रणा मजबूत होण्यासाठी वापरली जात असल्याने, ही बाब कराडकरांसाठी अभिमानास्पद आहे. श्री रेफ्रिजरेशनचे आर. जी. शेंडे, त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्री शेंडे आणि श्री रेफ्रिजरेशनच्या संपूर्ण स्टाफचे देशभरातून अभिनंदन होत आहे. “मेक इन इंडिया’अंतर्गत ही पाणबुडी तयार करण्यात आली असून समुद्रात गस्त घालताना गुप्त हेरगिरीचे काम पाणबुडी करणार आहे. युद्धातही ही पाणबुडी महत्त्वाची ठरणार आहे.
समुद्रात देखभाल करण्यासही ती सक्षम आहे. ही पाणबुडी संरक्षण सचिव अजयकुमार यांच्या हस्ते बुधवारी नौदलाच्या सेवेत दाखल झाली. माजगाव डॉकयार्ड येथे ही पाणबुडी समुद्रात सोडण्यात आली. सध्या समुद्रात पाणबुडीच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
या पाणबुडीतील वातानुकूलन यंत्रणेवर शेंडे हे गेली दोन वर्षे काम करत होते. या पाणबुडीच्या वातानुकूलन यंत्रणेच्या कामासाठी देश, विदेशातून निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात कराडच्या शेंडे यांच्या श्री रेफ्रिजरेटरने बाजी मारली.