कराड – कराड शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येथील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी संपूर्ण जिल्ह्यातील रूग्ण येत असल्याने स्थानिक लोकांना वैद्यकीय सेवा मिळविताना अडचणी निर्माण होत आहेत. याचा विचार करून पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी पालिकेत गुरूवारपासून मदतकक्ष सुरू केला आहे.
हा कक्ष चोवीस तास सुरू राहणार असून त्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कराड येथे करोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्रि स्पेशालिटी हॉस्पिटल व शारदा क्लिनिक या हॉस्पिटलांमध्ये सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून रूग्ण दाखल होत आहेत.
परिणामी सर्व रूग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. कराड शहरातही जुलै महिन्यापासून करोना बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. त्यांना उपचारासाठी तिन्ही हॉस्पिटलमध्ये हेलपाटे मारावे लागत असून त्यांची हेळसांड होत आहे. शहरातील तीन व्यक्तींचा तर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळीही एका रूग्णास बेड उपलब्ध होत नसल्याने खूप त्रास सहन करावा लागला.
अनेकांनी केलेल्या प्रयत्नानंतर संबंधितास बेड उपलब्ध झाला. मात्र, त्यासाठी बराच कालावधी गेला. अशी परिस्थिती पुन्हा उपलब्ध होऊ नये अशी शहरातील नागरिकांनी मुख्याधिकारी डाके यांना विनवणी केली. डाके यांनी याचा विचार करून गुरूवारपासून पालिकेत मदत कक्ष सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
त्याची तात्काळ अंमलबजावणी त्यांनी केल्याचे गुरूवारी दिसले. मदत कक्षाबाबत लगेच बैठक घेऊन तसा आदेश काढला. पालिकेतील तीन कर्मचाऱ्यांची या कक्षावर नियुक्ती करण्यात आली आहे. हा कक्ष चोवीस तास सुरू राहणार असल्याने तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावयाचे आहे. या कक्षात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी 1800233011111 असा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.
कक्षातील कर्मचाऱ्यांनी शहरातील संबंधित कोव्हिड हॉस्पिटल यांच्या संपर्कात रहावयाचे आहे. तेथील दूरध्वनी क्रमांकाची यादी ठेवणे बंधनकारक असणार आहे. तसेच दर एक तासाने संबंधित हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारे बेड याची माहिती घेणे तसेच नागरिकांनाही ती माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे डाके यांनी सांगितले.
नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींबाबत तात्काळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक व मुख्याधिकारी यांना माहिती देण्यात यावी. तसेच कामात कुचराई केल्यास कारवाई केली जाईल, अशाही सूचना दिल्या आहेत.