नाशिक: नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजी नगर भागात एक दुर्दैवी घटना घडली. दोन वर्षीय चिमुकल्याचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. गौरव शेवाळे असे या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (30 जुलै) सायंकाळी घडली.
गौरव आईसोबत घरात क्रिकेट खेळत होता. मात्र, त्याचा बॉल अचानक बाल्कनीतून खाली पडला. त्यामुळे बॉल घेण्यासाठी आई खाली आली. दुसऱ्या मजल्यावर राहात असल्यामुळे आईला खाली येण्यासाठी थोडा वेळ लागला.
गौरव बाल्कनीतूनच खाली बघत होता. आई खाली बॉल घेत असतानाच गौरवचा अचानक बघता बघता तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला. यामुळे गौरवच्या छातीला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गौरवला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी गौरवला मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.