मुंबई – ‘कपिल शर्मा’ देशातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केले, आता कपिलचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान कपिलने आपल्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. “सर्व उपलब्धी असूनही स्वत:ला मध्यमवर्गीय समजतो’. असं तो यावेळी म्हणाला. सध्या कपिलकडे 300 कोटींची संपत्ती असल्याचे समजते.
वास्तविक, मुलाखतीदरम्यान कपिलला विचारण्यात आले की, तुमची संपत्ती 300 कोटी आहे का? यावर तो हसला आणि म्हणाला…’माझे सुद्धा खूप पैसे बुडाले आहेत, पण खरं सांगायचं तर मी या सगळ्याचा विचार करत नाही. मला माहित आहे की माझ्याकडे घर आहे. एक कार आहे. माझे एक कुटुंब आहे आणि तेच महत्त्वाचे आहे’. अर्थात, मी संत नाही. मी चांगले पैसे नाकारणार नाही, पण आजही माझा विचार पगाराचा आहे. माझ्या पत्नीला गोष्टींवर खर्च करायला आवडते, पण मला नाही’. असं कपिल यावेळी म्हणाला.
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास दिग्दर्शित ‘झ्विगाटो’ या चित्रपटात कपिल शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. कपिल शर्मानेही पात्राला न्याय देण्यासाठी आपलं वजन देखील वाढवले आहे. इतकंच नाही तर त्याने या चित्रपटासाठी वापरलेली भाषाही वेगळी आहे. या चित्रपटात कपिल शर्माच्यासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी दिसणार आहे. ती या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.