मुंबई – जनता दल युनायटेडला नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीएमध्ये सामील झाल्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मात्र नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या जेडीयू पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचे समजते.
अशातच महाराष्ट्रातील शिक्षक आमदार आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील यांनी जेडीयूला सोडचिट्टी देत नवीन पक्षाची स्थापना केली आहे. “समाजवादी गणराज्य पार्टी” असे त्यांच्या पक्षाचे नाव असून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या पक्षाचे नामकरण केले आहे.
आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आणि जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते नाराज होते. पुरोगामी शक्तींनी भाजपसोबत जायला नको, असे त्याचे मत आहे.
त्यामुळेच त्यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या राजकीय भूमिकेची घोषणा होणार आहे. ‘समाजवादी ऐक्याचा धम्मघोष, समाजवादी गणराज्याचा संकल्प,’ असा नारा देत आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धारावीत संयुक्त समाजवादी संमेलन होणार आहे.
राज्याचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संमेलनाला संबोधित करणार आहेत. राज्यभरातील समाजवादी जनता परिवारातले नेते, कार्यकर्ते, जन संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने त्यात सामील होत आहेत.