कणादची हिमालयाला गवसणी

पिंपरी  – सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त असलेल्या कणादने वयाच्या तेराव्या वर्षी गंगोत्री ते गोमुख हा 28 किलोमीटरचा ट्रेक आणि चंद्रशीला पर्वत चढाई करत हिमालयाला गवसणी घातली. गढवाल हिमालयातील गंगोत्री ते गोमुख या पदभ्रमणाच्या पहिल्याच प्रयत्नात कणाद समुद्र सपाटीपासून 12 हजार 400 फूट उंचावर असणाऱ्या भोजबास या ठिकाणी सुखरूप पोहोचत तिरंगा फडकाविला.

हा मार्ग एकेरी 14 किलोमीटरचा असून त्याने गंगोत्रीच्या गंगा देवी मंदिरापासून ट्रेकला सुरुवात केली. चिंचोळ्या पायवाटेच्या उजव्या बाजूला दरीतून वाहणारी भागीरथी नदी आणि डाव्या बाजूला उंच पहाड यातून आईबाबांसमवेत कणादचा हा 14 किलोमीटरचा पायी प्रवास सुरु झाला. गंगोत्रीनंतर पहिला टप्पा 9 किमी वर चीडबास येथे तो पाच तासांत पोहोचला. वाटेत दोन वेळा कठडे नसलेल्या लाकडी फळ्यांच्या छोट्या पुलांवरुन भागीरथीच्या उपनद्या ओलांडण्याचे आव्हान कणादने यशस्वीरीत्या पेलले. चीडबास हे समुद्र सपाटीपासून 11 हजार 750 फूट उंचीवर आहे.

चिडबास पासून भोजबासपर्यंतचा मार्ग जास्त आव्हानात्मक होता. या मार्गात लॅंडस्लाईड झोन मोठ्या प्रमाणात असून त्याला अतिथंड वातावरणाचा सामना करावा लागला. जलदगतीने हा प्रदेश पार करत तो भोजबास येथे सुखरुप पोहोचला. त्यानंतर कणादचे पुढचे ध्येय होते चंद्रशीला पर्वत. चोपता येथून चढाईस सुरुवात केली. पायथ्यापासून चंद्रशीला पर्वत माथ्या पर्यंतचे अंतर गोमुख ट्रेकच्या तुलनेत कमी असले तरी अतिउंचीवर होणारा त्रास लक्षात घेता तुंगनाथ मंदिराजवळ मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रशीला माथ्याकडे चढाईला प्रारंभ केला. अरुंद पायवाट, अंगावर येणारा चढ आणि दाट धुक्‍यासोबत वाहणारे अतिथंड वारे यांचा सामना त्याने केला. कणाद जिद्दीने चंद्रशीला पर्वत माथ्यावर पोहोचत 13 हजार फूट उंची गाठण्यात यश मिळविले. माथ्यावरील मंदिरातील गंगामातेचे दर्शन घेऊन कणादने तिरंगा फडकवला. हिमालयातील कणादच्या पहिल्याच मोहिमेत त्याने मिळवलेल्या यशामुळे त्याच्या कक्षा आणखी रुंदावल्या आहेत. त्यामुळे आमचाही आत्मविश्‍वास वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.