राजगुरुनगर (रामचंद्र सोनवणे) – पुणे जिल्ह्यातील अनेक अलिशान चारचाकी भाड्याने देण्याचे आमिष दाखवून त्या परस्पर विक्री किंवा गहाण ठेऊन त्याद्वारे भरमसाठ पैसे घेणाऱ्या व गाडीमालकांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिनाभरात खेड पोलिसांनी 55 पैकी 48 गाड्या शुक्रवारी(दि 3) मुळ मालकांच्या स्वाधीन केल्या.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक सतिश गुरव, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मिळालेल्या गाड्या परत घेताना गाड्या मालकांनी सुटकेचा श्वास घेतला. जिल्ह्यात फसवणूक झालेल्या जवळपास 550 गाड्या असुन खेड पोलीस ठाण्यांतर्गत 55गाड्या होत्या. त्यातील 48 गाड्या मिळुन आल्या, 2 चा तपास केला आहे. तर उर्वरित 5गाड्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी सांगितले.
याबाबत अमोल मनाजी भागडे (रा. पाडळी) व सुभाष बाळू सांडभोर, (रा. थिगळस्थळ, राजगुरूनगर ता.खेड) यांनी दिनांक 4 नोव्हेंबर ला खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सांडभोर यांच्या कडून गेले एक ते दिड वर्षा पासुन आरोपी सागर मोहन साबळे, (रा. साबळेवाडी ता. खेड) याने वेगवेगळ्या कंपनीच्या एकुण 55 चारचाकी गाड्या मासीक भाडेतत्वावर घेतल्या व महिन्याला ठरावीक रक्कम देतो असे सांगून सुरुवातीला काही दिवस ठरल्याप्रमाणे बिनचुक भाडे दिले.
फिर्यादींचा विश्वास संपादन करून नंतर ठरल्याप्रमाणे भाडे देणे बंद करून सर्व गाड्यांचा अपहार करुन फिर्यादीसह सर्वांची फसवणूक केली. दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास गेले महिनाभर करण्यात आला.
गुन्ह्यातील अपहार झालेल्या गाड्या आरोपी सागर साबळे व साथीदारानी माजलगाव, बीड, परभणी, पाथरी, हिंगोली, बडवनी या भागातील लोकांना बेकायदेशीरपणे विकल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही गुन्ह्यातील अपहार झालेल्या एकुण 55गाड्यांपैकी काही गाड्यांचा जी.पी.एस. द्वारे शोध घेण्यात आला. तसेच काही गाड्यांचा गुप्त बातमीदार व आरोपी यांचेमार्फत शोध घेण्यात आला. आत्तापर्यंत एकुण 48 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. गुन्ह्याच्या अनुषंगाने यातील आरोपी सागर साबळे व साथीदार अजय लिंबाजी घुमाळ (रा. गजानन नगर माजलगाव ता. माजलगाव जि. बीड) यांना अटक करण्यात आली. त्यांचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. अटक आरोपींना राजगुरूनगर न्यायालयाने 4 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. या आरोपी विरुद्ध भोसरी, दौंड परीसरात देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक सतिषकुमार गुरव यांचे अधीपत्त्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार संतोष घोलप, बाळकृष्ण भोईर, पोलीस नाईक शेखर भोईर, सचिन जतकर, संदिप चौधरी, पोलीस अमलदार निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, विशाल कोठावळे, योगेश भंडारे, रमेश करंडे, संजय रेपाळे यांनी तपास करुन यातील आरोपींना जेरबंद करून दोन्ही गुन्ह्यातील अपहार झालेल्या एकुण 55 गाड्यांपैकी आत्तपर्यंत एकुण 48 गाड्या हस्तगत केल्या असुन खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.