नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आज केवळ सजावटीची आणि वापरली जाणारी वस्तू बनून राहीले आहेत. त्यांच्या तत्वांचे विस्मरण होत चालले आहे, अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नासिरा शर्मा यांनी व्यक्त केली. गांधीजींच्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.
गांधी प्रतिष्ठानच्या मेरे जिवन मे गांधी के रंग या विषयावर आपले विचार मांडताना नासिरा शर्मा म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले ते निघून गेले आणि जे आता आहेत ते निवडणूक जिंकून सत्तेत आले आहेत. हे लोक भूतकाळात बलिदान दिलेल्या लोकांच्या नावावर देश चालवत आहेत. आज गांधीजी केवळ एक शोभेची, सजावटीची वस्तू म्हणून राहीले आहेत आणि त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे. संपूर्ण जगात जेंव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेंव्हाच गांधींची आठवण केली जाते. त्यांची जगाला, समाजाला आज किती गरज आहे हे सगळ्यांना ठाउक आहे आणि या सगळ्याचा वापर कसा करायचा हे संधीसाधुंना चांगलेच समजत असते.
महात्मा गांधींचे बलिदान आणि फाळणीचे स्मरण करताना शर्मा म्हणाल्या की त्यांच्या अनेक रचनांमध्ये फाळणीचे दु:ख व्यक्त झाले आहे. महात्मा गांधी असतानाही या देशाचे विभाजन कसे झाले हा प्रश्न कायम माझ्या मनात असतो. मौलाना आझाद यांनी जामा मशिदीच्या पायऱ्यांवर उभे राहुन हा देश सोडून जाऊ नका असे आवाहन केले होते तरीही हे विभाजन झाले त्याचे कारण इंग्रजांचे फोडा आणि राज्य करा हे धोरण विजयी ठरले. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात दोन्ही समुदाय एकत्र लढले, मात्र १९४७ येता येता देशाची फाळणी झाली.
दांडी यात्रा करणारे, सत्याग्रह करणारे, अनेक विचार आणि तत्वज्ञान आपल्यात सामावून घेणारे महात्मा गांधी जागतिक स्तरावरील नेते होते. ती व्यक्ती हयात असतानाही देशाचे विभाजन कसे झाले, त्यांनी ते होऊ कसे हा प्रश्न कायमच येत असतो आणि अगदी निरागसतेने तो एका तक्रारीचे स्वरूप प्राप्त करून प्रदीर्घ काळ एक वेदना बनून माझ्यासोबत राहीला. सरहद के इस पार या माझ्या कथेमधील रेहानच्या चरित्रात कदाचित याचेच प्रतिध्वनी उमटले असावेत.