मुंबई – प्रख्यात गितकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणावतच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता. त्या प्रकरणात सोमवारी अर्थात 4 जुलै कंगना न्यायालयात हजर झाली होती. तेव्हा तिने अख्त्तर यांच्या विरोधात अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. जावेद अख्तर यांनी आपल्याला धमकावले होते असा आरोपही तिने केला आहे.
न्यायालयात जेव्हा कंगनाची तपासणी सुरू झाली तेव्हा आपली बहिण आणि वकिलाच्या व्यतिरिक्त कोणीही न्यायालयात असू नये अशी विनंती कंगनाने केली होती. ती मान्य करण्यात आली. जावेद अख्तर यांच्या वकिलालाही यावेळी बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त एका प्रतिष्ठित माध्यमाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
काय म्हणाली कंगना?
आपण हृतिक रोशनची माफी मागण्यास नकार दिल्यावर आपल्याला धमकावण्यात आले. अपमानित करण्यात आले. रोशन कुटुंबाचे राजकीय लागेबांधे आहेत. त्याचे परिणाम भोगावे लागतील असे आपल्याला सांगण्यात आले.
डुप्लिकेट किंवा तोतया व्यक्ती उभा करण्यास आम्हाला वेळ लागणार नाही. आम्ही हृतिकचा डुप्लिकेट उभा करू. तेव्हा तुझे प्रेमसंबंध हृतिकसोबत नव्हते तर त्याच्या डुप्लिकेटसोबत होते हे लोकांना कळेल आणि तुझी बदनामी होईल असेही आपल्याला सांगण्यात आल्याचे कंगना म्हणाली.