शेतकरी आंदोलकांना ‘अतिरेकी’ म्हणणाऱ्या कंगनाला ट्विटरचा दणका; केली ‘ही’ कारवाई

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन देशातील सेलिब्रेटींसह विदेशातील सेलिब्रेटी देखील समर्थनार्थ आणि विरोधात उतरले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्‌वीट केले होते.

रिहानाच्या या ट्विटटवरून कंगनाने निशाणा साधला होता. “आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही’, अशी टीका तिने केली होती. तसेच कंगनाने शेतकरी आंदोलकांना “अतिरेकी” म्हणत भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे म्हटले होते. यासंदर्भात ट्विटरने आक्षेप घेत कंगनाचे ट्विट डिलिट केले आहेत.

ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही लागू केलेल्या पॉलिसीच्या श्रेणीनुसार ट्विटर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्विटवर कारवाई केली आहे. कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली आणि लिहिले की, “आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला होता.

यावर पलटवार करत कंगनाने ट्‌वीट केले की, “या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरून चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बसून राहा. आमचा देश विकायला आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही. तसेच आणखी एका ट्‌वीटमध्ये रोहित शर्मावर टीका केली होती. हे दोन्ही ट्‌वीट हटविण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.