मनाली – सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावतला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबतची फिर्याद तिने मनाली पोलिसांमध्ये दाखल केली.
सोशल मिडियावरून ही धमकी देण्यात आल्याचे कंगनाने आपल्या फिर्यादित नमूद केले आहे. मात्र धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव पोलिसांनी स्पष्ट केले नाही. या संदर्भात योग्य तपास करून आरोपींना गजा आड केले जाईल, असे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत कुल्लूचे पोलीस अधिक्षक गुरदेव शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, कंगना राणावतने मनाली पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारपत्र दिले आहे,त्यात सोशल मीडियावर एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 295 ए, 504, 505,506,509 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कंगनाच्या अडचणीत वाढ
शीखांसदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीचे अध्यक्ष राघव चड्डा यांनी कंगनाला समन्स पाठवले आहे. त्यामुळे या प्रकरणात कंगनाला 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. कंगनावर शिख समुदायाविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.