मेलबर्न, – ओमिक्रोन विषाणूच्या पार्श्वभुमीवर ऑस्ट्रेलियामध्ये आता नव्याने लॉकडाऊन लागू केला जाणार नाही, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे. नवीन कोविड व्हेरिएंटच्या पार्श्वभुमीवर मॉरिसन यांनी काल राज्य आणि प्रादेशिक पातळीवरील नेत्यांबरोबर चर्चा केली.
या प्रादेशिक सरकारांना ओमिक्रोन विषाणूबद्दलची जाणीव करून देण्यात आली आहे. आगामी नाताळच्या काळात स्थानिक आणि राज्यांच्या सीमांवर अधिक लक्ष ठेवण्यात यावे. अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियामध्ये नव्याने लॉकडाऊन लावला जाणार नाही, असे मॉरिसन यांनी स्पष्ट केले.
ओमिक्रोन विषाणूला हातळले जाऊ शकेल, असा विश्वास राज्यांनी व्यक्त केला असल्याचे ऑस्ट्रेलियाचे आरोग्य मंत्री ग्रेग हंट यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियामध्ये ओमिक्रोन विषाणूची बाधा झालेले 6 रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात 1 हजार नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी बहुतेक जण व्हिक्टोरिया भागातील आहेत.