काबुल – कंदहार प्रांताची राजधानी असलेल्या कंदहार हा महत्वाच्या शहराचा ताबाही आता तालिबान्यांच्या हातात गेला आहे. अफगाणिस्तानात जे 34 प्रांत आहेत त्यातील 12 प्रांतांच्या राजधान्यांवर आता तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे.
कंदहार अफगाणिस्तानातील काबुल नंतरचे दुसऱ्या क्रमाकांचे मोठे शहर आहे. गुरूवारी रात्री हे शहर तालिबान्यांच्या ताब्यात आले. त्यामुळे त्या शहरातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विमानाद्वारे त्या शहरातून पलायन केले.
त्यानंतर तालिबानी गनिमांनी सरकारी इमारतींचा ताबा घेऊन त्यावर आपल्या संघटनेचे निशाण लावले. तालिबान्यांनी अलिकडेच गझनीचाही ताबा घेतला असून तेथील हमरस्ता त्यांनी बंद केला आहे.
काबुल शहरातून दक्षिणेकडील प्रांतांकडे जाण्यासाठी हा रस्ता वापरला जातो. तो तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याने त्या भागात अफगाणिस्तान सरकारची मदत किंवा अन्य रसद पोहचण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
आता फक्त काबुल हे महत्वाचे शहर अजून सरकारच्या ताब्यात राहिले आहे. जवळपास दोन तृतीयांश अफगाणिस्तानवर आता तालिबान्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान तेथील स्थितीचा अंदाज घेऊन काबुल मधील आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना माघारी सुरक्षित आणण्यासाठी अमेरिकेने तिकडे आपले तीन हजार जादा सैनिक पाठवले आहेत.
आमच्या दोन मरिन इन्फंट्री बटालियनच्या दोन तुकड्या येत्या दोन दिवसात काबुल विमान तळ आणि दूतावासाच्या सुरक्षेसाठी पोचणार आहेत अशी माहिती अमेरिकी लष्करी मुख्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.