Who is Dinesh Singh Babbu : देशात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय मैदान तयार झाले आहे. आता राजकीय पक्ष या मैदानात दोन हात करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय जनता पक्षाने आज शनिवारी (30 मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. या यादीत बॉलिवूड अभिनेता आणि गुरुदासपूरचे खासदार सनी देओलचे नाव नाही. त्यांच्या जागी पक्षाने दिनेश सिंह बब्बू यांना तिकीट दिले आहे.
कोण आहेत दिनेश सिंग बब्बू?
ठाकूर दिनेश सिंह उर्फ बब्बू हे भाजपचे नेते आहेत. दिनेश सिंह बब्बू हे सुरजपूरमधून आमदारही राहिले आहेत, पण 2022 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार नरेश पुरी यांनी त्यांचा पराभव केला. दिनेश सिंह हे पंजाब विधानसभेचे उपसभापतीही होते.
दिनेश सिंह हे दोन वेळा आमदार –
दिनेश सिंह उर्फ बब्बू यांचा जन्म 17 जून 1962 रोजी गुरुदासपूरच्या मनवाल गावात झाला. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (पठाणकोट) सरचिटणीस होते. 2007 आणि 2012 मध्ये ते दोनदा आमदार होते.
दरम्यान, पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. राज्यातील सर्व 13 जागांवर सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे.