पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- उन्हाळ्याची चाहूल लागताच लालबुंद कलिंगडांची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात वाढली आहे. तापमान वाढेल तसा कलिंगडांचा हंगाम बहरत चालला आहे. बाजारात कलिंगडांची दररोज ८० ते १०० टन आवक होत आहे. ही आवक मागील १५ दिवसाच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आहे. भावातही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उन्हाळ्यामुळे मागणी आहे. तसेच, मुस्लीम धर्मियांकडून रमजान महिन्यात उपवास केले जातात. उपवास सोडण्यासाठी कलिंगड, खरबूज अशा रसाळ फळांना मागणी वाढते. मंगळवारपासून (दि. १२) रमजान महिन्याचा प्रारंभ होणार आहे. रमजान महिन्यात कलिंगडांच्या मागणीत वाढ होईल, अशी माहिती मार्केट यार्डातील कलिंगड व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली.
कलिंगडांचा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. अहमदनगर, सोलापूर, सातारा तसेच पुणे जिल्ह्यात कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कलिंगडांच्या सिंबा, मेलडी, मॅक्स या जाती आहेत. आकाराने छोटे आणि चवीला गोड असणाऱ्या या कलिंगडांना मागणी चांगली आहे. ज्युस विक्रेत्यांकडून कलिंगडांच्या मागणीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात एक किलाे कलिंगडांचे भाव प्रतवारीनुसार ८ ते २० रुपये आहेत, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकातील बंगळुरू भागात नामधारी कलिंगडांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. नामधारी कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते. नामधारी कलिंगडांना फळ विक्रेते तसेच ज्यूस सेंटर चालकांकडून मागणी असते. घरगुती ग्राहक छोट्या आकाराचे कलिंगड खरेदी करतात, असे त्यांनी सांगितले.
उच्चांकी आवक…
रमजान महिन्यात कलिंगडाच्या मागणीत मोठी वाढ होते. त्यामुळे शेतकरी माल राखून ठेवतात. आता, ८० ते १०० टन आवक होत आहे. रमजान महिना सुरू होताच मार्केट यार्डातील फळबाजारात ही आवक १५० ते २०० टनपर्यंत पोहोचेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.