नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची आई माधवी राजे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे. त्यांना दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिंदे यांना खोकला आणि ताप ही लक्षणं दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.
ज्योतिरादित्य आणि त्यांची आई माधवी राजे यांना चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्योतिरादित्य यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत होती. पण त्यांच्या आईमध्ये कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. पण दोघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
लॉकडाऊनपासूनच ज्योतिरादित्य हे दिल्लीत आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दिल्लीत आहेत. ज्योतिरादित्य यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. ते कॉंग्रेसचे महासचिव होते. पण त्यांनी कॉंग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे भाजपमध्ये आल्यानंतर मध्यप्रदेशमधील कॉंग्रेस सरकार पडलं. भाजपने ज्योतिरादित्य यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.