वृद्ध दाम्पत्यासाठी कोर्ट आले दोन मजले उतरून
तडजोडीअंती खटला काढला निकाली
पुणे –“न्याय आपल्या दारी’ संकल्पनेचा प्रत्यय शनिवारी शिवाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयात आला. सुमारे 80 किलोमीटर प्रवास करून आलेल्या 95 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या 85 वर्षीय पत्नीला भेटण्यासाठी कोर्ट दोन मजले उतरून खाली आले.
संबंधित दाम्पत्याच्या 62 वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणातील नुकसान भरपाईचा दावा साडेपाच लाख रुपये देत निकाली काढला. सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर, ऍड. अतुल गुंजाळ आणि ऍड. जयश्री वाकचौरे यांच्या पॅनेलपुढे हा दावा निकाली निघाला.
सीताराम रामभाऊ चासकर (वय 95) आणि त्यांची पत्नी शांताबाई (वय 85, दोघेही रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांची मुलगी मंदा यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात मोटार अपघात न्यायप्राधिकरणात ऍड. संतोष चासकर यांच्यामार्फत दावा दाखल करण्यात आला होता. मंदा या अंगणवाडी सेविका होत्या. त्या 22 फेब्रुवारी 2018 रोजी नाशिक फाटा येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी त्यांना कारने धडक दिली.
उपचारादरम्यान त्यांचा तीन दिवसांनंतर एका रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी 7 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यांचा हा दावा शनिवारी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आला होता. अर्जदार हे वृद्ध असल्याने त्यांना ना चालता, ना ऐकायला येत होते. त्यांना व्यवस्थित दिसतही नव्हते. या स्थितीत दोन मजले चढून न्यायालयात जाणे शक्य नव्हते. त्यामुळे कोर्ट पायऱ्या उतरून खाली आले.