पुणे -पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मात्र, या पट्ट्याची तीव्रता थोडी कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील 24 तासात कोकणात मुसळधार तर विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.
परंतु, पुण्यासह मध्य महाराष्ट्राला जोरदार पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.
विशेषत: घाटमाथा परिसरात पावसाचे स्थिती चांगली असली तरी अजूनही अपेक्षित पाऊस पडला नसल्याने पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अद्यापही जोरदार पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची स्थिती दिसून येत आहे. आगामी काळात पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज विभागाकडून देण्यात आला आहे.