जुन्नर -करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत गेल्या पंधरा दिवसांपासून घरात लॉक झालेल्या युवकांनी करमणुकीसाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. कुटुंबीय किंवा मित्रांच्या व्हॉट्स्ऍप ग्रुपवर वेगवेगळे टास्क दिले जात आहेत.
प्रथम ग्रुपवरील सर्व सदस्यांना ऑनलाइन येण्यासाठी ठराविक वेळ सांगितली जाते. त्यावेळेत टास्क देणारी ही व्यक्ती विविध घरगुती, कौटुंबिक टास्क देते. मग ते पूर्ण करताना सदस्य व त्याचे कुटुंबीय धमाल मजा घेत आहेत.
हे विविध टास्क पूर्ण करून त्याचा फोटो किंवा व्हिडीओ ग्रुपवर टाकावा लागतो. जो पहिला फोटो टाकेल तो विजेता. विशेष म्हणजे ही टास्क भन्नाट आणि विचित्र असल्यामुळे ती पूर्ण करताना कुटुंबीयांची धावपळ तर होतेच. पण सोबत हसून हसून पुरेवाट लागते.
या टास्क गेममुळे अनेक ग्रुपवर धमाल उडाली आहे. सदस्य नातेवाइक, मित्र ऑनलाइन भेटल्याचा आनंद घेत आहेत. अनेकाचा वेळ मोबाइलवर जात आहे. नेहमीचे एक-दीड जीबी नेट पुरेनासे झाले आहेत. मात्र, तरीही कौटुंबिक जिव्हाळा वाढल्याचे सर्वत्र जाणवत आहे.
काय आहे हे, भन्नाट टास्क
नवऱ्याला टिकली लावणे, स्वयंपाक घरातील पाच भांडी, फरशी पुसणारा सदस्य, प्रवासात लागणाऱ्या जास्तीत जास्त वस्तू, कुटुंबाची सेल्फी, जमिनीवर झोपलेला कुटुंब प्रमुख, लहानपणीचे फोटो, कुठल्याही पाच भाज्या, नंबरप्लेटसह गाडी, भिंतीवरील घड्याळ, टोपी घालून छत्री पकडलेला सदस्य आदी टास्क पूर्ण करून त्याचे फोटो सदस्यांना ग्रुपवर पटापट टाकावे लागतात.
या टास्कसह गॉगल घालून डान्स करतानाचा 10 सेकंदाचा व्हिडीओ, कुठलंही गाणं म्हणतानाचा 15 सेकंदांचा व्हिडीओ आदी व्हिडीओही अपलोड करण्याचे टास्क दिले जाते. टास्क गेममध्ये परिवाराचे दीड-दोन तास आनंदात जात आहेत.
काही ठिकाणी तर जास्त ग्रुप असल्यामुळे सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध ग्रुपवर एक-एक तासांच्या टास्क गेमचे आयोजन सुरू आहे. मात्र, या गेम्समुळे घरातील सदस्य घरातच राहत असल्याने संचारबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे मत कामशेत येथील वैशाली शाह यांनी व्यक्त केले आहे.