पुणे – करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे नियोजन करण्यासाठी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे संचालक, अभ्यास मंडळाचे सदस्य यांची बैठक घेतली. त्यात सध्याच्या लॉकडाऊनबाबत विविध शक्यता गृहित धरून नियोजन करण्यात आले आणि सर्वांना सूचना देण्यात आल्या. ही बैठक “झूम’द्वारे घेण्यात आली.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण राज्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत.14 एप्रिलनंतर सरकारकडून काय निर्णय जाहीर केला जातो, याबाबतही नेमकेपणाने काही सांगता येत नाही. या अनिश्तिततेच्या परिस्थितीत पुढचे नियोजन कसे करायचे, याबाबत कुलगुरू प्रा. करमळकर यांनी झूम या सुविधेद्वारे बैठक घेतली.
गुरुवारी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील संबंधितांशी संवाद साधला, तर शुक्रवारी पुण्यातील प्राचार्य, संस्थांचे संचालक यांची अशाच प्रकारे झूमद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत लॉकडाउन कालावधीबाबत विविध शक्यता गृहित धरून प्रा. करमळकर यांनी संबंधितांना सूचना केल्या. यावेळी उपस्थित प्राचार्य, संस्थांचे संचालक व अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी विविध पर्यायही सुचवले.
परीक्षा रखडण्याची समस्या सर्वच विद्यापीठांसमोर आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायच्या, कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबत सर्वच विद्यापीठांपुढे प्रश्नचिन्ह आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत घेतलेल्या बैठकीतून ठरलेल्या नियोजनाचा अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे, जेणेकरून इतर विद्यापीठांनाही हे नियोजन मार्गदर्शक ठरेल, अशी माहिती प्रा. करमळकर यांनी दिली.