उजनी धरण पर्यटनाच्या नुसत्याच गप्पा

जागा नाही, निधीही नाही : जलसंपदा मंत्र्यांची कबुली

पुणे  – उजनी धरण परिसरात उभारण्यात येणारे पर्यटन केंद्रासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध होत नाही. तसेच निधी कमतरता यामुळे या कामास सुरुवात झाली नसल्याची कबुली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

 

 

उजनी येथील पर्यटन केंद्राबाबत विधानपरिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर जलसंपदा मंत्री पाटील यांनी हे उत्तर दिले. उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) सहा हेक्टर जागेची मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली आहे. मागील एक वर्षापूर्वी हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

 

 

मात्र त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. उजनी धरण परिसरात येणारे परदेशी पक्षी, विस्तीर्ण असा जलाशय, मावळतीच्या सूर्याचे पाण्यात उमटणारे प्रतिबिंब आदी गोष्टींचे मनोहरी सौंदर्याचा आनंद पर्यटकांना घेता येण्यासाठी येथे पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय एमटीडीसीने घेतला. या परिसरात पर्यटक निवास, वृदांवन गार्डन, वॉच टॉवर, टेन्ट हाऊस, बोटींग उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे रोजगारच्या संधीही स्थानिक नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

 

 

उजनी धरण बांधून 40 वर्षे होऊनदेखील येथे पर्यटन केंद्र सुरू झालेले नाही. येथे पर्यटन केंद्र व्हावे, अशी मागणी होत आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान व म्हैसूर येथील वृदांवन उद्यानच्या धर्तीवर येथे उद्यान साकारण्यात यावे, अशी मागणी आहे. याविषयी माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, “उजनी धरणालगतच्या अतिरिक्त जमिनीवर पीपीपी धोरणानुसार उद्यान उभारण्याबाबतची कार्यवाही केली जाईल.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.