Virat Kohli | टी-20 क्रमवारीत कोहलीची प्रगती

दुबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी टी-20 क्रिकेट क्रमवारीत फलंदाजांच्या गटात एका स्थानाने प्रगती केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत कोहली आता सहाव्या स्थानावर आहे. त्याचे क्रमवारी गुण आता 697 झाले आहेत.

लोकेश राहुलने 816 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. या यादीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये दोन भारतीय फलंदाजांचा समावेश असून, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी दोन फलंदाज आहेत. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान व न्यूझीलंड यांच्या प्रत्येकी एका फलंदाजाचा या यादीत समावेश आहे.

यादीत इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वल स्थानावर असून त्याच्या नावावर 915 गुण आहेत. कोहलीप्रमाणेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (801) व दक्षिण आफ्रिकेच्या वॅन डेर डसेन (700) यांच्याही स्थानात सुधारणा होऊन त्यांना अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर जागा मिळाली आहे.

दरम्यान, न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज डेव्हन कॉनवे व सलामीवीर मार्टिन गुप्टिल यांच्या गुणातही वाढ झाली आहे. सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे त्यामुळे या क्रमवारीत दर आठवड्याला बदल होत आहेत. कॉनवेने तब्बल 46 गुण मिळवत 17 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर गुप्टिलने 14 व्या स्थानावरून 11 व्या स्थानी झेप घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.