जुन्नर -जुन्नर तालुक्यात सर्वाधिक बिबट असून बिबट सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यात झाला पाहिजे, जोपर्यंत तो प्रकल्प जुन्नर तालुक्याला मंजूर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. जुन्नरच्या आमदारांना जुन्नर तालुक्यातील कोणत्याही विषयाचा अभ्यास नाही, त्यांच्यामुळेच ही वेळ आली असल्याची टीका सोनवणे यांनी केली आहे. असे माजी आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले
जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी रोजगाराचे संरक्षण उभे रहावे, यासाठी बिबट सफारी केंद्र होणेकरिता शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार शरद सोनवणे हे किल्ले शिवनेरीवर दर्शन घेऊन छत्रपती स्मारक पाचरस्ता चौक येथे मंगळवार (दि. 22) पासून उपोषणाला बसले आहेत. यावेळी वन्यपक्षी सामाजिक संघटना, रामराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, डिंगोरे येथील आदिवासी समाज आदी संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
याप्रसंगी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, विघ्नहर देवस्थानचे गणेश कवडे, नगराध्यक्ष शाम पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघाचे दत्ता लोहोटे, शहरप्रमुख चंद्रकांत डोके आदी उपस्थित होते. शरद सोनवणे म्हणाले की, आमचा बळी गेल्यावर न्याय द्याल तरी तो घ्यायला तयार आहोत.
बिबट सफारीच्या नावाखाली तात्पुरते प्राणी संग्रहालय बनवायचा जो डाव आहे तो आम्ही शिवसैनिक उधळून लावू तर जुन्नरमधील बिबट सफारी ही तालुक्याच्या अस्तित्वाची व रोजगाराची लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले.