पुणे –शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून केंद्र शासनाच्या हवा गुणवत्तासुधार कार्यक्रमांतर्गत आणखी 200 ई-बसचा समावेश पीएमपीच्या ताफ्यात केला जाणार आहे. या सर्व बस सात मीटर लांबीच्या मिनी बस असणार आहेत. त्यामुळे शहरातील लहान रस्ते असलेल्या भागात या बसेसचे संचलन शक्य होणार आहे. या बसेस भाडेकराराने घेतल्या जाणार असून त्यासाठीच्या निविदा काढण्यास महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी मंगळवारी मान्यता दिली. या कार्यक्रमांतर्गत महापालिकेस केंद्राकडून 80 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले असून या निधीतून हा खर्च केला जाणार असल्याचे कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कुमार म्हणाले की, शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यातील सर्व डिझेल बस बंद केल्या जाणार आहेत. त्यासाठी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून सुमारे 7 मीटर लांबीच्या 300 बसेस भाडेकराराने घेतल्या जाणार असून त्यातील 200 बसेस महापालिका घेणार आहे. एका बसची किंमत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये असून या बसेस निविदा काढून भाडेकराराने घेतल्या जाणार असून संबंधित कंपनीस अथवा ठेकेदारास प्रती किलोमीटर दराने त्याचे भाडे
दिले जाईल.
डीझेल बस बंद करणार
पुढील दोन वर्षांत महापालिकेकडून पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या सर्व डीझेल बस बंद केल्या जाणार आहेत. पीएमपीकडे सध्या 350 डिझेल बस असून त्या तातडीची बाब म्हणून वापरण्यात येणार आहे. आतापर्यंत पीएमपीकडे 200 ई-बस आल्या असून मार्च अखेरपर्यंत आणखी 50 बस दाखल होणार आहेत. मात्र, या सर्व बस 12 मीटर लांब असल्याने शहराच्या मध्यर्ती भागात त्या वापरता येत नाहीत. त्यामुळे, आता आणखी 300 मिडी बस आल्यास सर्व डिझेल बस बंद करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही वर्षांत शहरात केवळ ई-बस आणि सीएनजी बसद्वारेच पीएमपीचे संचलन असणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.