पिंपरी – उद्योगनगरी म्हणून नावारुपाला आलेले पिंपरी-चिंचवड शहर अजूनही बऱ्याचशा बाबींबाबत पुण्यावर अवलंबून आहे. पुण्याचे तापमान आणि पर्जन्यमान पिंपरी-चिंचवडचे असल्याचे मानले जाते होते. परंतु आता शहराचे तापमान कळावे यासाठी तीन ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित होत आहे. तीन ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बसविण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून दररोजचे तापमान कळणार आहे.
शहरातील तापमान, पर्जन्यमान आणि हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी सध्या चिंचवड येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाने बसविलेली एकमेव यंत्रणा कार्यान्वित आहे. भोसरी, थेरगाव-डांगे चौक, पिंपळे निलख येथील तीन उद्यानांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, हवेची गुणवत्ता, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड या वायूंचे हवेतील प्रमाण आदी कळणार आहे. महापालिकेच्या वतीने मात्र याबाबत तूर्तास कोणतीही व्यवस्था केलेली नाही.
शहराच्या नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. शहरात हजारो लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामुळे शहराच्या पर्यावरणाच्या उपाय-योजनेसाठी शहराचे तापमान आणि पर्जन्यमान मोजणारी स्वतंत्र यंत्रणा असणे खूप गरजेचे आहे. शहरात दररोजचे तापमान किती आहे, पुढील काही दिवसांत किती तापमान राहील, हवामान निरभ्र राहील का? पावसाची चिन्हे आहेत का, असे विविध अंदाज समजण्यासाठी तापमान आणि पर्जन्यमान मोजणारी यंत्रणा शहराच्या विविध भागात असणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत आजपर्यंत पुरेशा गांभीर्याने घेण्यात आलेले नाही.
चिंचवड येथील कमलनयन बजाज स्कूल येथे सध्या भारतीय हवामानशास्त्र विभागाने तापमान, पर्जन्यमान आणि हवेतील आर्द्रता मोजणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्या व्यतिरिक्त सद्य:स्थितीत शहरात दुसरी यंत्रणा सुरू नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरामध्ये 3 ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
महापालिकेने बसविली नाही यंत्रणा
महापालिका प्रशासनाकडून मात्र तापमान किंवा पर्जन्यमान मोजण्यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. महापालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी बसविण्यात येणाऱ्या यंत्रणेसाठी आवश्यक जागा मात्र उपलब्ध करून दिली आहे. ही यंत्रणा बसविण्याचे काम महापालिका प्रशासनाचे नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आयएमडीच्या वतीने चिंचवड येथे तापमान, पर्जन्यमान आणि हवेतील आद्रता मोजण्याची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. त्याच्या माध्यमातून चिंचवड येथील हवामान आयएमडीला समजते. पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोन ते तीन ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यास ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे.
– जयंत इंदुरकर, हवामानशास्त्रज्ञ,
आयएमडी, पुणे.