जुन्नर, आंबेगावकरांनी सतर्कता बाळगावी

सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

जुन्नर – मुसळधार पावसाच्या शक्‍यतेने जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यातील नागरिकांनी सतर्कता बाळगत घरातच थांबावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

या संभाव्य वादळामुळे तालुक्‍यात पुढील दोन-तीन दिवसांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराची कौले, पत्रे तसेच शेतातील काढून ठेवलेला शेतीमाल याची खबरदारी घ्यावी, असे डुडी यांनी सांगितले आहे. आधीच करोनामुळे घरात बंद असलेल्या नागरिकांना पुढील दोन-तीन दिवस तरी पुन्हा क्‍वारंटाइन व्हावे लागण्याची शक्‍यता आहे.

या चक्रीवादळाचे “निसर्ग’ असे नामकरण करण्यात आले असून बुधवारी (दि. 3) उत्तर महाराष्ट्रात धडकण्याची शक्‍यता आहे. ते वादळ पुढील 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील दोन -तीन दिवसांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) याबाबतचा अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट भागामध्ये अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतातील मालाला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग कामाला लागला असून या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे, असे प्रांताधिकारी डुडी यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.