उपायुक्त राजेंद्र मुठे यांची माहिती; रुग्णसेवेस यंत्रणा सज्ज
पुणे – सीओईपीच्या मैदानावरील जम्बो हॉस्पिटल आज (मंगळवार, दि.25) सुरू होत आहे. या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था सीओईपीमध्ये करण्यात येणार आहे. तसेच सीओईपीतील केअर सेंटरमधील रुग्णांची व्यवस्थाही जम्बो हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे.
सीओईपीमधील केअर सेंटर जम्बो हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतर सीओईपीच्या मोकळ्या झालेल्या जागेमध्ये कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेतील उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी ही माहिती दिली.
शहरात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महापालिकेकडून विविध महाविद्यालयांच्या वसतिगृहांमध्ये आणि इमारतीमध्ये 17 कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. त्यात 6 हजार 479 बेडची व्यवस्था करण्यात आली होती. या सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या मात्र पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येते. त्यांच्या तपासणीसाठी या ठिकाणी 24 तास डॉक्टरांचे पथक कार्यरत असते.
सरकारच्या निर्देशानुसार शहरातही सौम्य आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांनी होम क्वॉरंटाइन होण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण होम क्वॉरंटाइन आहेत. परिणामी, पालिकेच्या करोना केअर सेंटरवरील ताण कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी आणि प्रशासकीय मनुष्यबळ वाचवण्यासाठी 17 पैकी 8 केअर सेंटर काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली. बंद ठेवलेल्या सेंटरमधील रुग्ण जवळच्या सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात आले. यानंतर आता सीओईपी येथील केअर सेंटर बंद करण्यात येणार आहे. येथील रुग्णांचे स्थलांतर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे.
त्यामुळे मोकळ्या होणाऱ्या खोल्यांमध्ये ही भविष्यात शहरातील रुग्णसंख्या विचारात घेऊन बंद केलेले सेंटर सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुठे यांनी सांगितले आहे. दरम्यान, हे जम्बो कोविड हॉस्पिटल 1800 खाटांचे असून, 600 ऑक्सिजन आणि 200 व्हेन्टिलेटर बेडची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. आजपासूनच हे हॉस्पिटल सुरू होत आहे. रविवारीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे ऑनलाइन उद्घाटन झाले आहे.