मुंबई – हॉलीवूडमधील ‘बार्बी’ आणि ‘ओपनहायमर’ या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. लहान मुलांसाठी ‘बार्बी’ चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. नुकतेच टीव्ही अभिनेत्री जुही परमार तिच्या 10 वर्षांच्या मुलीसह चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. मात्र हा चित्रपट अर्ध्यावर सोडून जुही तिच्या मुलीसह चित्रपटगृहाच्या बाहेर पडली. असे करण्यामागचे तिने कारणही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत दिली आहे.
जुहीने ‘बार्बी’ चित्रपटाबाबत संताप व्यक्त केला आहे. तिने पोस्ट शेअर करत लिहिले की, “प्रिय ‘बार्बी’ सगळ्यात आधी मी माझी चूक मान्य करते. कारण- माझ्या 10 वर्षांच्या समायराला मी तुमचा चित्रपट पाहायला घेऊन गेले. हा चित्रपट पॅरेंटल गायडन्स अंडर १३ आहे याकडे मी लक्ष दिले नाही. चित्रपट सुरू झाल्यावर सुरुवातीच्या 10 मिनिटांत असलेले आक्षेपार्ह भाषा, सीन्स पाहून मला चित्रपटगृहातून बाहेर पडावे लागले. मी माझ्या मुलीला हे काय दाखवले, असा प्रश्न मला पडला.”
“ माझी मुलगी हा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक होती, परंतु, प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर मला धक्का बसला आणि मी निराश झाले. सुरुवातीच्या 10 ते 15 मिनिटांत मी बाहेर पडले. अनेक पालक त्यांच्या लहान मुलांसह चित्रपट पाहण्यासाठी आले होते. या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छिते की, तुमच्या चित्रपटाची भाषा 13 वर्षांखालील नाही, तर त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठीही अयोग्य आहे.”
“चित्रपटगृहातून घरी आल्यावर मी ‘बार्बी’चे प्रोमो तपासले, तेव्हा माझ्या लक्षात आले की, आक्षेपार्ह भाषा, सीन्स प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेले नाही. मग ही लोकांची दिशाभूल नाही का? पण, हे केवळ ‘बार्बी’बद्दल नसून आमच्याकडील सुद्धा निम्म्याहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये खूप अयोग्य कंटेंट दाखवला जातो. तुमच्यापैकी काही जणांना माझे मत पटणार नाही किंवा राग येईल. पण, ही पोस्ट सगळ्या पालकांसाठी आहे. मी केलेली चूक तुम्ही करू नका. कृपया चित्रपट पाहायला जाण्यापूर्वी संपूर्ण खात्री करा.” असे जुहीने पोस्टमध्ये लिहिले आहे. याशिवाय तिने मला चुकीचे समजू नका. मी केलेली चूक करू नका, मुलाला चित्रपट दाखवण्यापूर्वी तपासून घ्या, शेवटी निवड तुमची आहे, असे आवाहनही तिने पालकांना केले आहे.