नवी दिल्ली – एका खासगी विद्यापीठाच्या आजारी कुलपतींना रूग्णालयात नेण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर उभी असलेली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची ( Judge car for sick help ) कार बळजबरीने नेणे अखिल भारतीय विद्यार्थी ( Abvp ) परिषदेच्या दोन कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरले आहे. या प्रकरणात त्यांना जामीन देण्यास विशेष न्यायाधीश संजय गोयल यांनी नकार दिला आहे. कोणीही व्यक्ती मदत मागाताना ती विनम्रतेने मागतो, बळाचा वापर करून मागत नाही असे न्यायाधीशांनी जामीन याचिका फेटाळताना नमूद केले.
हिमांशु श्रोत्रीय ( Himanshu kshetriy ) आणि सुकृत शर्मा ( Sukrut sharma ) ही अभाविपच्या ( abvp ) कार्यकर्त्यांची नावे आहेत व ते संघटनेचे ग्वाल्हेर येथील सचिव आणि उपसचिव आहेत. दोघांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आजारी कुलपतींना रूग्णालयात नेण्यासाठी या दोघांनी संबंधित वाहनाच्या चालकाकडून बळजबरीने चावी हिसकावून घेतली होती. या प्रकरणात त्यांना मंगळवारी न्यायालयात नेण्यात आल्यानंतर १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली होती. जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी न्या. गोयल म्हणाले की, आरोपींनी वाहनचालकाकडून कारची चावी घेतली तोपर्यंत तेथे ॲम्बुलन्स दाखल झाली होती. रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी ॲम्बुलन्सच उपयुक्त असते.
दरम्यान, आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा दावा करत अभाविपने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे मध्य प्रदेश सचिव संदीप वैश्णव म्हणाले की, सोमवारी एका प्रवशाची रेल्वेत प्रकृती बिघडली होती. संबंधित रेल्वेगाडीतून अभाविपचे काही कार्यकर्ते प्रवास करत होते. त्यांनी ग्वाल्हेर येथील कार्यकर्त्यांना फोनवर याची माहिती दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आजारी व्यक्तीला ग्वाल्हेर स्थानकावर उतरवले.
२०-२५ मिनीटे होऊनही ॲम्बुलन्स न आल्यामुळे आणि रूग्णाची प्रकृती बिघडली असल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमधून रूग्णालयात नेले मात्र त्यांचा मृत्यू झाला. रूग्णाला वेळेवर रूग्णालयात नेले असते तर त्यांचा जीव वाचला असता. ज्या वाहनातून आजारी कुलपतींना रूग्णालयात नेण्यात आले होते ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे असल्याचे त्यांना नंतर समजले. आमच्या कार्यकर्त्यांनी केवळ एका आजारी व्यक्तीची मदत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, ज्या रूग्णाचा मृत्यू झाला ते उत्तर प्रदेशातील झांसी येथील खासगी विद्यापीठाचे कुलपती होते आणि रणजीत सिंह (वय ६८) असे त्यांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.