नवी दिल्ली – संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी लष्कराच्या इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीशी ५३०० कोटी रूपयांचा करार केला आहे. इलेक्ट्रॉनिक फ्यूज हा मध्यम ते जड कॅलिबर तोफांचा एक अविभाज्य घटक आहे जो लष्करी ऑपरेशन्ससाठी तोफखाना मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.
उत्तर सीमेवरील उंच ठिकाणी तैनात केल्या जाणाऱ्या तोफांमध्ये हा फ्युज वापरला जातो. संरक्षण मंत्रालयाने १५ डिसेंबर रोजी पुण्यातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, कंपनीशी हा दहा वर्षांचा करार केला आहे. हा एकूण ५३३६.२५ कोटी रूपयांचा करार आहे. संरक्षण विभागासाठी देशांतर्गत कंपन्यांकडूनच साहित्य खरेदी केेले जात असून आयात कमी करण्यासाठी सरकार हा प्रयत्न करीत आहे.
हे इलेक्ट्रॉनिक फ्यूज बीईएलद्वारे त्यांच्या पुणे आणि आगामी नागपूर प्लांटमध्ये तयार केले जातील.या प्रकल्पामुळे दीड लाख मनुष्य दिवसांसाठी रोजगार निर्माण होईल आणि भारतीय उद्योगांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहन मिळेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.