पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा, या मुख्य मागणीसाठी पुण्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी छेडलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. राज्य सरकारने हा निर्णय मान्य करताच आंदोलनस्थळी (अलका चौक) येथे उमेदवारांनी जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले.
राज्यसेवेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी टिळक चौकात मंगळवारी (दि.31) आंदोलन केले. सकाळी दहा वाजता पोलीस बंदोबस्तात आंदोलनाला सुरुवात झाली. या मागणीसाठी आतापर्यंत तीन वेळा आंदोलन करण्यात आले होते. मात्र राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने पुन्हा चौथ्यांदा आंदोलनाचा निर्णय उमेदवारांनी घेतला. या आंदोलनात माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार सहभागी झाले होते.
वर्णनात्मक परीक्षेचा निर्णय चांगला असला तरी त्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. दोन वर्षांचा अवधी मिळाल्यास परीक्षेला सामोरे जाताना अडचणी येणार नाहीत. त्यामुळेच आम्ही 2025 पासून हा पॅटर्न लागू करण्यासाठी आग्रही आहोत, असे आंदोलनकर्ते उमेदवारांनी सांगितले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे पत्र दिले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आल्याचे खोत यांनी जाहीर केले. मंत्रिमडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचा निरोप फडणवीस यांनी खोत, पडळकर आणि पवार यांच्याकडे दिला. त्यामुळे मंगळवारी निर्णय होणार हे निश्चित झाले होते.
यामागे राजकीय स्वार्थ नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण अभ्यास करून हा प्रश्न कॅबिनेटसमोर मांडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हा निर्णय झाला आहे. यामागे कुठलाही राजकीय स्वार्थ नाही. एमपीएससीच्या उमेदवारांना न्याय देण्याचे काम सरकारने केले आहे. शेवटी उमेदवारांचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी पुढाकार घेतला, अशी प्रतिक्रिया तीनही आमदारांनी दिली.
एमपीएससी उमेदवारांची मागणी राज्य सरकारने मान्य केली. त्याचे स्वागत आहे. उमेदवारांच्या आंदोलनास युवक कॉंग्रेसने पूर्वीपासून सहभाग घेत पाठिंबा दर्शविला होता. अखेर उमेदवारांच्या एकजुटीमुळे राज्य सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. यापुढेही उमेदवारांच्या प्रश्नांसाठी युवक कॉंग्रेस सोबत राहील.
-अक्षय जैन, सरचिटणीस, युवक कॉंग्रेस