राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासंबंधी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याची संयुक्त बैठक संपन्न

पुराच्या पाण्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाखालील भराव काढून कमानी करण्याच्या आणि रस्त्यांची उंची वाढवण्याच्या सूचना

कोल्हापूर – भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या. राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नदीच्या पाण्याला अडथळा न येता पाणी वाहते राहण्यासाठी भराव काढून कमानी करा व रस्त्यांची उंची वाढवा, अशा सूचना कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार व लोकप्रतिनिधींनी केल्या.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कागल ते पेठ नाका आणि पेठ नाका ते शेंद्रे या प्रस्तावित सहापदरी प्रकल्पाच्या कामाबाबत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याची संयुक्त बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सर्वश्री संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री राजूबाबा आवळे, चंद्रकांत जाधव, मानसिंग(भाऊ) नाईक, अरुण लाड, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, एनएचएआयचे मुख्य महाप्रबंधक व क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, महाप्रबंधक मधुकर वाठोरे, प्रकल्प संचालक वसंत पंधरकर, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुरामुळे महामार्ग बंद राहणार नाही, याची दक्षता घेऊन सहापदरीकरण व्हावे -पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर जिल्ह्यात 2019 व 2019 च्या पूर परिस्थितीमुळे महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक मार्ग बंद राहिले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यादृष्टीने महामार्गांचे प्रकल्प बनवावेत, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

ते म्हणाले, कोल्हापूर शहर प्रवेशद्वारा नजीक शिरोली ते मार्केटयार्ड पर्यंत शहरात येण्यासाठी नवीन उड्डाणपूल करण्यात येत आहे. यामुळे पूरपरिस्थितीतही शहरात प्रवेश करणे शक्य होईल. तावडे हॉटेल चौकानजीक पंचगंगा नदी ते सांगली फाट्यापर्यंत पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी नवीन ’13 बॉक्सेस कलवर्ट्स’ची तरतूद करण्यात आली आहे.यामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील मंत्री महोदय, खासदार व आमदार यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून महामार्गाच्या प्रस्तावित कामांमध्ये दुरुस्ती करावी. तसेच करण्यात येणाऱ्या दुरुस्ती बाबत माहिती द्यावी. हे कामे गतीने सुरू करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री.पाटील यांनी केल्या. नागपूर- रत्नागिरी महामार्गाच्या कामाबाबत येत्या पंधरा दिवसांत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कागल एमआयडीसी (लक्ष्मी टेकडी) येथे 95 मीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल करण्यात येत असून कागल एसटी स्टँड समोर एसटी बसेस ना सहजपणे ये-जा करण्याच्या दृष्टीने नवीन उड्डाणपूल तयार करावा.

साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील सहापदरीकरण प्रकल्पाबाबत सूचना केल्या. ते म्हणाले, गावांमधून जाणाऱ्या दोन लेनमधील अंतर कमी ठेवावे, महामार्गावरील खड्ड्यांमुळे तसेच साचलेले पाणी उडून अपघात होवू नये याची दक्षता घ्यावी.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महामार्गाखालील भुयारी मार्गावर पाणी साचून नागरिकांची गैरसोय होवू नये, याची दक्षता घ्यावी. महामार्गाशी संबंधित विविध कामांच्या दृष्टीने नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया, जलसंधारण विभाग व महसूल विभागाची संयुक्त बैठक घ्यावी.

सिक्कीम चे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी होणारी हानी टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पुराच्या पाण्याला अडथळा येऊ नये, यासाठी पुलांचे रुंदीकरण करणे, पुलाखालील भराव काढून कमानी करणे आवश्यक आहे. नदीचे पाणी निरंतर वाहत राहील व पाण्याला अडथळा येऊन पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी महामार्गांची कामे करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सांगली जिल्ह्यातील महामार्ग कामाच्या अनुषंगाने पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वतीने खासदार व आमदार यांनी सूचना केल्या. यावेळी तिन्ही जिल्ह्यातील खासदार व आमदार यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या.

एनएचएआय चे मुख्य महाप्रबंधक व क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, मान्यवरांनी बैठकीत केलेल्या सूचनांचा विचार करून शक्य ते बदल करून काम सुरू करण्यात येईल.हा मार्ग आदर्श मार्ग ठरेल, अशा पद्धतीने बनवण्यात येईल, असा विश्वास एनएचएआयचे मधुकर वाठोरे व वसंत पंधरकर यांनी यावेळी दिला.

बैठकीमध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार मानसिंग नाईक, अरुण लाड, चंद्रकांत जाधव व राजूबाबा आवळे यांनी महामार्गाच्या सहापदरी कामाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन ही कामे मार्गी लावावीत. या महामार्गावर वाहतूक कोंडी होवू नये, अपघात होऊ नयेत, नागरिकांना सहजपणे वाहतूक करता यावी, याचा विचार करून महामार्गाची कामे करावीत. महामार्गाच्या दोन बाजूला गाव व शेती असणाऱ्या ठिकाणी ऊसाचे ट्रॅक्टर, ट्रक, अशी अवजड वाहने ये-जा करण्याजोगे रुंद भुयारी मार्ग बनवा, असे त्यांनी सांगितले. पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.