UP Election : काँग्रेसने 7 जागा राखल्या तरी मोठी कामगिरी ठरेल : भाजप

लखनौ  -उत्तरप्रदेशात कॉंग्रेसचे बिल्कूल अस्तित्व नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने उत्तरप्रदेशात सध्याच्या सात जागा राखल्या तरी ती मोठी कामगिरी ठरेल, अशी खिल्ली त्या राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी रविवारी उडवली.

उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ती निवडणूक ताकदीने लढवण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. त्यासाठी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सातत्याने त्या राज्याचा दौरा करत आहेत.

त्यांचा झंझावात सत्तारूढ भाजपसाठी आव्हान ठरू शकतो, अशा चर्चा झडत आहेत. मात्र, भाजपचे नेते असणाऱ्या मौर्य यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या चर्चा फेटाळून लावल्या. कॉंग्रेसला 2014 मधील लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात केवळ दोन जागा जिंकता आल्या. ती संख्या 2019 मधील निवडणुकीत केवळ एकवर आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षही भाजपपुढे कुठले आव्हान उभे करू शकणार नाहीत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तरप्रदेशात 403 पैकी 325 जागा जिंकल्या. यावेळी त्यापेक्षा अधिक जागा जिंकणे एवढेच आव्हान भाजपपुढे आहे, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.