जम्मू :- राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआय) मंगळवारी काश्मीर खोऱ्यात नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. ज्या स्वयंसेवी संस्था सामाजिक कामासाठी गोळा केलेला निधी टेरर फंडिंगसाठी पाठवतात, अशा संस्थांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या संशयित व्यक्तींच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. त्यातून संशयास्पद आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. अजूनही छापेमारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि दहशतवादी कारवाया सुरू ठेवण्यासाठी फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटनांच्या वतीने काही एनजीओ, ट्रस्ट, सोसायट्या आणि संघटनांकडून निधी गोळा करुन तो या दहशतवादी संघटनांना हस्तांतरित केला जातो.
27 मार्च रोजी या प्रकरणाच्या संदर्भात एजन्सीने श्रीनगरमधील सोनवार बाग येथे छापे देखील टाकले होते. ही मोहिम आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याचे एनआयएने सांगितले आहे.