श्रीनगर – जम्मू आणि काश्मीर सरकारने दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या चार सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ केले आहे. बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंभू प्रमुख सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा आणि सध्या तुरुंगात असलेल्या फुटीरवादी नेत्याच्या पत्नीचाही समावेश आहे.
या चौघांना भारताविरुद्ध काम करणाऱ्या शक्तींशी संबंध असल्याच्या आरोपावरून आणि दुर्भावनापूर्ण प्रचार केल्याबद्दल बडतर्फ करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना घटनेच्या कलम 311 अन्वये बडतर्फ करण्यात आले आहे.
या कलमानुसार सरकार कोणत्याही चौकशी शिवाय कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते. याच कारणावरून जम्मू-काश्मीरमधील सरकारी सेवेतून आतापर्यंत सुमारे 40 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्या राज्यातील प्रशासनाने दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही आपली करडी नजर ठेवली आहे.