मुंबई – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही व्यक्ती काँग्रेसचे ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी यांना मारहाण करताना दिसत आहेत. आव्हाडांच्या मते मारहाण करणारी व्यक्ती मुख्यमंत्री शिंदेंचे कार्यकर्ते आहेत. हा व्हिडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये जितेंद्र आव्हाड अनेकदा सरकारच्या चुकांविरोधात आक्रमक भूमिका मांडताना दिसून येतात. नुकतंच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन ते तीन कार्यकर्ते एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. तू भाईबद्दल का पोस्ट टाकली.. माफी माग असं म्हणत एका व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते. काँग्रेस प्रवक्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा हा व्हिडीओ असल्याचे समजते.
काय म्हणालेत आव्हाड पोस्ट शेअर करताना
“महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्य पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्य पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागितली.हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड.. मग पोलिस छळणार.. स्वता मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार.. जेल मध्ये सडवणार. हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे.. आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार ” अशी खंत आव्हाडांनी यावेळी व्यक्त केली आहे.
मा महाराष्ट्र राज्याचे ना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर आक्षेपार्य पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी ह्याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक ह्यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्य पोस्ट डिलीट करण्यात आली व… pic.twitter.com/aPKWWuCUq7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 29, 2023
एकूणच आव्हाड यांनी इतर पक्षातील कार्यकर्त्यांबाबत देखील हाच न्याय का लागू होत नाही असा सूतोवाच करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सोशल मीडियावर अनेकजण या व्हिडिओबाबत आपले म्हणणे मांडत आहेत.