मुंबई – ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. रामायणावर आधारित या चित्रपटातील पात्रांच्या पेहरावामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आवाज उठवला होता. त्यानंतर आता रामनवमीनिमित्त या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात अभिनेता प्रभास, अभिनेत्री क्रिती सनॉन, सनी सिंग आणि देवदत्ता नागे हे कलाकार दिसत आहे. मात्र त्यांच्या लुकवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अभिनेता प्रभासने ‘मंत्रों से बढ के तेरा नाम, जय श्री राम’, असे कॅप्शन देत हा पोस्टर शेअर केला आहे. त्यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहे. ‘ही काय मस्करी आहे, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’, ‘प्रभासने हा प्रोजेक्ट सोडून द्यावा’, अशा प्रतिक्रिया नेटकरी करत आहे. ‘चित्रपटाची डेट पुढे का ढकलली? यात काहीच बदल दिसत नाही,’ असा सवालही नेटकरी करत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला तेव्हाही बराच वाद झाला होता. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या VFX ची लोकांनी खूप चर्चा केली होती. त्यानंतर त्याचे प्रदर्शनही काही काळ पुढे ढकलण्यात आले. आता निर्मात्यांनी निवेदन जारी करत चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट आता 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट IMAX 3D मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेले VFX प्रेक्षणीय असणार आहे. मात्र, जेव्हा टीझर रिलीज झाला तेव्हा लोकांना VFX फारसे आवडले नाही. या चित्रपटात प्रभास रामाच्या आणि क्रिती सेनॉन सीतेच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सैफ अली खान रावणच्या आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.