पुणे – जेईई मेन परीक्षा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.एस्सी. ब्लेंडेड या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा या एकाच दिवशी होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा त्या दिवशीच्या कोणत्याही तीन सत्रात देता येऊ शकते. त्यामुळे परीक्षेच्या तारखेत बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
आयआयटी, एनआयटी, संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई मेन ही प्रवेश परीक्षा महत्त्वाची आहे. त्याच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. जेईई मेनच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा 20 ते 25 जुलैदरम्यान होत आहे. त्याच कालावधीत विद्यापीठाच्या बी.एस्सी. ब्लेंडेड या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा 25 जुलै रोजी आहे. दोन्ही प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यापीठाची प्रवेश परीक्षा पुढे ढकलावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, “विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षेचे नियोजन अन्य प्रवेश परीक्षांचा तारखा पाहूनच करण्यात आले आहे. सकाळ, दुपार आणि सायंकाळ या तीन सत्रांत विद्यापीठाची प्रवेश परीक्षा होत आहे.’